Friday, July 26, 2013

सुंदर लेख - स्टीव जॉब्स स्टॅनफोर्ड विद्यापीठ



    "मरावे परी कीर्तिरूपे उरावे"......
    अ‍ॅपल कॉम्प्युटरचा जन्म १९८४ सालचा...तेव्हापासून आजपर्यंत मी तरी अ‍ॅपलच्या प्रेमात पडलो आहे.
    सुंदर लेख
    स्टी
    स्टॅनफोर्ड विद्यापीठ

सुंदर लेख - स्टीव जॉब्स स्टॅनफोर्ड विद्यापीठ

    * अ‍ॅपलचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स नुकताच कंपनीतून पायउतार झाला. त्याआधी स्टॅनफोर्ड विद्यापीठानं त्याला विद्यार्थ्यांसमोर भाषणासाठी बोलावलं होतं.  तेथील भाषणाचा हा स्वैर अनुवाद ... उद्याच्या अ‍ॅपलकारांसाठी *
    
    मित्रांनो, मला तुमच्यासमोर भाषणासाठी संधी मिळाली, याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे.  इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठातील बुद्धिमान मुलांसमोर बोलायला मिळणं, हा मला माझा मोठा सन्मान वाटतो.  खरं सांगायचं विद्यापीठाशी माझा संबंध आला तो हा असा आणि इतकाच.  कारण तुमच्यासारखं असं माझं शिक्षण कधीच झालं नाही.  आता तुमच्यासमोर आलोच आहे, तर मला तीन प्रमुख गोष्टी तुमच्यासमोर उघड करायच्या आहेत.

    पहिलं म्हणजे मी माझं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. सहा महिन्यांतच मला इथल्या वातावरणाचा कंटाळा आला.  नंतर कसंबसं वर्ष काढलं मी महाविद्यालयात. पण मी इथं कधी रमलोच नाही.  हे असं का झालं असावं?  माझ्या दृष्टीनं याची कारणं माझ्या जन्मातच असावीत. माझी
    आई अविवाहित असतानाच तिला मी झालो.  बाळंत झाली तेव्हा ती महाविद्यालयात शिकत होती.  तेव्हा तिची परिस्थिती लक्षात घेता तिनं मला दत्तक द्यायचं ठरवलं.  एक वकील आणि त्याची सुविद्य पत्नी मला दत्तक घेणार होते.  पण ऐन वेळी ते म्हणाले त्यांना मुलगी हवीये.  तेव्हा माझी आई चिडली.  तिची अट होती की कोणा पदवीधरालाच मला दत्तक द्यायचं.  पण हे असं घडलं.  तेव्हा ऐन वेळी जो समोर आला, त्याला तिनं मला देऊन टाकलं.  अट एकच.  मला महाविद्यालयात शिकू द्यायचं.  तेव्हा माझे आताचे जे आईवडील आहेत, ते मला लाभले.
    
    गरीब होते ते.  पण त्यांना मी शिकावं असं प्रामाणिकपणे वाटत होतं.  माझ्या खऱ्या आईच्या इच्छेला मान देत त्यांनी मला शिकू द्यायचं ठरवलं.  तेव्हा मी महाविद्यालय निवडलं ते अगदी महागडं होतं.  अगदी स्टॅनफोर्डइतकं.  माझं म्हणणं शिकायचं तर मग स्वस्त महाविद्यालयात कशाला जा.  पण खरं सांगायचं तर त्यात काहीही अर्थ नव्हता.  कारण मी जे काही शिकत होतो, त्यातलं काहीही मला आवडत नव्हतं.  एकीकडे पोटाला चिमटा काढून माझी फी भरणारे माझे आईवडील आणि ओढूनताणून शिकणारा मी.  १७ वर्षांचा होतो, तेव्हा हे जाणवलं.  मग ठरवलं.  हे फारच होतंय.  आयुष्यात काय कराचंय ते दिसत नाहीये आणि तरीही आपण आईवडिलांचे घामाचे पैसे असे उधळतोय.  हे बरोबर नाही.  त्याच क्षणी निर्णय घेतला.  हे नावडतं शिकणं थांबवायचं.  बाहेर पडलो महाविद्यालयातून.  मोकळा श्वास घेतला.  एव्हाना जाणवलं होतं, आपण जे काही करतोय ते फारच स्वप्निल आहे.  मित्राच्या वसतिगृहावर राहायला गेलो.  इतरांच्या रिकाम्या कोकच्या बाटल्या वगैरे विकून जेवायला चार पैसे मिळाले तर मिळवायचो.  आठवडय़ातून एकदा मात्र पलीकडच्या गावातल्या हरे कृष्ण मंदिरात जायचो.  अर्थात तिथे काही भक्ती वगैरे होती म्हणून नाही. तर तिथे आरतीनंतर मोफत जेवण मिळायचं म्हणून.  पण तिथे जायलाही पैसे नसायचे. तेव्हा चालत जायचो.म्हणजे जायचे यायचे १४ किमी अंतर मी चालायचो.  या काळात मला प्रश्न पडायचा.  मला नक्की काय आवडतंय.  तेव्हा लक्षात आलं.  आपलं सुलेखन कलेवर प्रेम आहे.  मग ते शिकायला लागलो.  अक्षरांचे आकार, त्यांचे तलम पोत मला फार आवडायचे.  अक्षरांच्या नुसत्या मांडणीतूनसुद्धा काही सांगता येतं, असं मला वाटायचं.  आपण त्यांना कसं सादर करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं, हे मला जाणवलं.  त्यामुळे मी त्या कलेचं शिक्षण घ्यायला लागलो.  जे शिकतोय त्याचा काय उपयोग, नोकरी मिळणार आहे का त्यामुळे, वगैरे फालतू प्रश्नांनी मी मला विचलित होऊ देत नव्हतो.  आवडतंय ना ... शिकायचं.  इतकाच तो विचार.

    पुढे १० वर्षांनी जेव्हा मी माझा पहिला संगणक तयार केला, तेव्हा या सुलेखन कलेचा उपयोग झाला.  कारण इतरांच्या तुलनेत माझ्या संगणकाचा कळफलक जास्त चांगला आणि सुलेखनासाठी उपयुक्त असलेला होता.  मी तेव्हा जे शिकलो, ते हे असं उपयोगी आलं.  मग जाणवलं, बरंच झालं आपलं महाविद्यालय सुटलं ते.  मी असा त्या वेळी बाहेर पडलो नसतो, तर हे काही जमलंच नसतं.

    दुसरी गोष्ट माझ्या उद्योगाची.  मी आणि वॉझ यांनी माझ्या वडिलांच्या गॅरेजमध्ये पहिला संगणक तयार केला.  बरीच खटपट करावी लागली.  चांगलं फळ आलं त्याला.  तेव्हा आम्ही नाव दिलं आमच्या संगणकाचं अ‍ॅपल.  हे जमलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो.  मग आम्हीदोघांनी कंपनीच काढली.  पुढच्या १० वर्षांत आम्हा दोघांच्या कंपनीत चार हजारजण नोकरीत होते आणि अ‍ॅपलचा आकार २०० कोटी डॉलर्सचा झाला होता.  आमचा पहिला मोठा संगणक जन्माला आला होता.  मॅकिंतोश.  मी तेव्हा तिशीत होतो.  तिथे दुसरा धक्का बसला.

    मला माझ्या भागीदारानं कंपनीतून काढूनच टाकलं.  मला प्रश्न पडला.  मीच जी कंपनी जन्मालाघातली, तिथून मलाच कसं काय हे लोक बाहेर काढतात.  पण तसं झालं होतं खरं.  तेव्हा मी ठरवलं, या प्रश्नाच्या उत्तरात रक्त आटवायचं नाही.  नवं करूया काहीतरी.  खरं तर समोर अंधार होता.  पण म्हटलं हरकत नाही.  जमेलच आपल्याला काही ना काही.  तशी खात्री होती.  कारण माझं माझ्यावर प्रेम होतं.  शांत बसलो.  स्वत:लाच विचारलं.  झालं ते झालं.  आपल्याला आता काय करायला आवडेल?  माझं पहिलं प्रेम होतं ते अर्थातच अ‍ॅपल.  दुसरं काय?  तर तेही अ‍ॅपलच.  मग दुसरी संगणक कंपनी काढायची मी ठरवलं.  तिला नाव दिलं नेक्स्ट.  पाठोपाठ दुसरा उद्योग सुरू केला पिक्सर नावानं.  जगातली पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म मी केली.  तिचं नाव टॉय स्टोरी.  आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही.  याच काळात माझ्या कंपनीचा विस्तार इतका झाला की अ‍ॅपलला पुन्हा मोह झाला या कंपन्या घेण्याचा.  कारण मी विकसित केलेलं तंत्रज्ञानच तसं होतं.  शेवटी अ‍ॅपलनं या कंपन्या विकत घेतल्या.  मी आपोआपच पुन्हा अ‍ॅपलमध्ये आलो.  अ‍ॅपलचा सध्याचा जो काही विस्तार सुरू आहे तो मी नेक्स्ट आणि पिक्सरमध्ये जे काही केलं, त्याच्या जोरावर.  इथंच मला माझी जीवनसाथी मिळाली.  लॉरीन आणि माझा संसार उत्तम सुरू आहे.
    
    मागे वळून बघितल्यावर आता मला वाटतं, अ‍ॅपलनी मला हाकललं नसतं तर नेक्स्ट आणि पिक्सर जन्माला आल्या असत्या का?  आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला लॉरीन मिळाली असती का?
    माझी तिसरी गोष्ट मरणा विषयीची आहे.
    
    सतराव्या वर्षी मी कुठेतरी वाचलं होतं, आपण प्रत्येक उगवणारा दिवस हा आपला जणू शेवटचाच दिवस आहे असं जगायला लागलो तर एखादा दिवस असा उजाडतो की त्या सगळय़ा जगण्याचा अर्थ कळतो.  हे वाक्य माझ्या डोक्यात सतत गुंजत असतं.  मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही.  यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात.  आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते.  याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो.  आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला ... त्याचं काय केलं?  तो सत्कारणी लावला का?  हा प्रश्न माझ्या डोक्यातून कधी जात नाही.
    
    गेल्या वर्षी कर्करोग झाल्याचं निदान झालं.  ते कळल्यावर डॉक्टरांनाच वाईट वाटलं.  कारण हा अगदी दुर्मीळ असा कर्करोग आहे.  स्वादुपिंडाचा.  डॉक्टर म्हणाले, तयारीला लागा ... शेवटच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्या ... जेमतेम तीन महिने तुम्हाला मिळतील.

    मी घरी गेलो.  दोन दिवसांनी माझी बायोप्सी करायची होती.  त्यासाठी मला डॉक्टरांनी भूल दिली.  घशातून एंडोस्कोप पोटात सोडला अणि माझ्या स्वादुपिंडाच्या काही पेशी घेऊनतो बाहेर आला.  मी बेशुद्धच होतो.  पण लॉरीन ते सगळं पडद्यावर बघत होती.  ती म्हणाली, एंडोस्कोप बाहेर आल्यावर डॉक्टरच रडायला लागले.  कारण त्यांना लक्षात आलं, परिस्थिती काही इतकी वाईट नाही.  शस्त्रक्रिया केली तर मी वाचू शकेन.  तशी ती शस्त्रक्रिया झाली आणि मी वाचलो देखील.

    मृत्यूच्या या स्पर्शानं मला बरंच काही शिकवलं.  मरणाइतकं काहीही शाश्वत नाही.  आपल्याला वेळ कमी असतो आणि तरीही त्यातला मोठा वाटा आपण वायाच घालवतो.  तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचंय ते इतकंच की ... इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं ... याचा कसलाही विचार करू नका ... इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका ... जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा.  तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं ... त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका.  बाकीचं सगळंच दुय्यम असतं. धन्यवाद.

No comments: